संततधार विधी म्हणजे काय ?

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (१२)

संततधार विधी म्हणजे काय ?

असा प्रश्न ब-याच जणांच्या मनात येतो; कारण फक्त नरसोबाच्या वाडीलाच हा विधी संपन्न होतो. श्री क्षेत्र नृसिंह वाडी येथे हा संततधार विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो. या वेळेच्या यात्रेदरम्यान संततधार संपन्न होणार आहे. वैशाखवणव्याचा दाह श्री दत्तमहाराजांच्या सुकुमार पाऊलांना होऊ नये म्हणून त्यांच्या मनोहर पादुकांवर प्रथम दत्तदेवस्थान तर्फे सलग आठवडाभर दिवसरात्र जलाभिषेक होत असतो.

त्यावेळी नृसिंहवाडीचे पुजारी ३ पाळ्यांत आठ तास पवमानसूक्त, रुद्रावर्तने, पुरुषसूक्त, श्रीगुरुचरित्र पठण करीत असतात. एरवी शेजारती नंतर देवांच्या कट्टयावर जायला परवानगी नसते पण संततधार चालू असताना मध्यरात्रीही भक्त मागील बाजूला अभिषेक चालू असलेल्या पादुकांचे दर्शन घेऊ शकतात. त्यावेळी पुजारी भक्तांना पादुकांवरील पवित्र तीर्थ देतात. देवस्थानच्या संततधारेनंतर ज्या यजमानांना वैयक्तिक संततधार करायची असेल ते देवस्थानच्या परवानगीने करू शकतात. पूर्वी बरेच यजमान संततधार करीत होते पण वेळेच्या अभावामुळे आणि महर्गतेमुळे आता एखाद्दोनच होतात.

To book your puja visit our website.

देवाच्या कट्टयावर मागील बाजूच्या ओवरीत एका मोठ्या परातीत अभिषेकासाठीच्या दत्तपादुका ठेवल्या जातात. एका मोठ्या अडणीवर अभिषेकपात्र ठेवले जाते. अत्यंत कडक सोवळ्यात आठ दिवस संततधार चालू असते. दहा ब्राह्मण सोवळ्याने नदीचे पाणी आणून हंडे भरत असतात. दोन ब्राह्मण समोरासमोर बसून सतत वेदपठण करीत असतात. पादुकांवरील जलाभिषेकाचे तीर्थ फार पवित्र असते आणि खरोखरच अकाल मृत्युहरण व सर्व व्याधींचा नाश करणारे असते अशी भाविकांची श्रद्धा आहे. ओवरी नारळाच्या झावळ्यांनी आणि विविध फुलांनी सजवलेली असते.

श्रीनरसिंहसरस्वती दत्त महाराजांची सुरेख तसबीर ठेवलेली असते. सातही दिवस श्रीगुरुचरित्र सप्ताह सुरू असतो. ब्राह्मणांना अल्पोपहार, भोजन सर्व दिले जाते. समाप्तीला १० ते १५ ब्राह्मण सामुदायिक पवमानसूक्त म्हणतात तेंव्हा अंगावर रोमांच येतात आणि डोळे प्रेमाश्रूंनी भरून येतात. मग सेवेकरी ब्राह्मणांना वस्त्र, दक्षिणा देऊन सन्मान केला जातो व मिष्टान्नभोजन देऊन समारोप होतो. मित्रमेत्रिणिंनो, मध्यरात्रीच्या शांततेत, मंद वाहणाऱ्या सरितेच्या ध्वनीने आणि ब्राह्मणांच्या धीरगंभीर वेदपठणाने ब्रह्मानंद होतो. जरूर लाभ घ्या.

संततधार विधी चैत्र शुद्ध पंचमी ते द्वादशी असे आठ दिवस असतो.

।।श्रीगुरूदेवदत्तार्पणमस्तु।।

श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवस्थान,
श्री क्षेत्र नृसिंहवाडी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, पिनकोड नं. ४१६१०४.

Source: Unknown Author