श्री क्षेत्र कुरवपूर (कुरगड्डी) (१)

श्री क्षेत्र कुरवपूर (कुरगड्डी) (१)

स्थान: आंध्र प्रदेशात कृष्णा स्टेशन पासून २७ कि. मी. अंतरावर बेट
सत्पुरूष: श्रीपादश्रीवल्लभ
विशेष: तपोभूमी, ध्यानधारणा, उपासनेसाठी उत्तम ठिकाण
पादुका: श्रीपाद श्रीवल्लभ पादुका

उपासनेच्या माध्यमातून आत्मिक बळ मिळवून मानवी जीवनातील कर्तव्ये पूर्ण करत परमेश्वराची प्राप्ती करणे हा दत्त उपासनेचा मार्ग आहे. महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा सर्वाधिक प्रसार झाला. या कारणास्तव महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध दत्तस्थाने आहेत. दत्त उपासनेला श्री नृसिंहसरस्वतींमुळे दत्त संप्रदायाचे स्वरूप प्राप्त झाले. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रेयांचे पहिले अवतार मानले जातात. ‘कुरवपूर’ हे त्यांचे अक्षय निवासस्थान होय.

‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’

या मंत्राचा उच्चार होताक्षणी नजरेसमोर येते ते ‘श्री क्षेत्र कुरवपूर’ या मंत्राचा उगम ज्या ठिकाणी झाला तेच ते प्राचीन स्थान. ही तपोभूमी मानली जाते.

दत्तभक्तांचा वेद समजला जाणाऱ्या ‘गुरूचरित्र’ या मंत्र ग्रंथांतील अध्याय ५ ते १० हे प्रथम दत्तावतार यांच्याविषयी आहेत. भगवान दत्तात्रेय यांनी सुमती व आपलराज यांना दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांच्या पोटी जो प्रथमावतार संपन्न केला ते श्रीपादवल्लभ होय. वयाच्या सोळाव्या वर्षी माता-पित्यांचा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ प्रथम गोकर्ण महाबळेश्वरला गेले व तेथून श्रीशैल पर्वतावर जाऊन तेथे त्यांनी काही काळ वास्तव्य केले. नंतर फिरत फिरत ते कुरवपूर येथे आले. तेथे बावीस वर्षे तपश्चर्या करून इथूनच ते अंतर्धान पावले.

कुरवपूर क्षेत्र स्वातंत्र्यापूर्वी निजाम राज्यात होते. सध्या ते कर्नाटकात रायचूर जिल्ह्यात येते. कुरूगुड्डी या छोट्या खेडयाजवळ कृष्णा नदीचे नैसर्गिकरीत्या दोन भाग झाले आहेत व पुढे ते दोन भाग एकत्र आले आहेत. जेथे कृष्णेचे दोन भागात विभाजन झाले आहे त्या भागाला ‘कुरगुड्डी बेट’ म्हणतात. हेच ते श्रीपाद श्रीवल्लभांचे स्थान. याच बेटावर दगडांच्या गुहेत श्रीपाद श्रीवल्लभ तपश्चर्या करीत व या गुहेसमोरील मोठया औदुंबर वृक्षाखाली अनुष्ठान करीत. बेटावरील दोन-चार घरी माधुकरी मागून ते निर्वाह करीत.

To book your puja visit our website.

सकाळी उठल्यावर नदीवर स्नान करून, ते सूर्यनमस्कार घालीत. ते ज्या शिळेवर उभे राहून सूर्यनमस्कार घालीत त्या वेळेची त्यांची शिळेवर पडणारी छाया अजूनही स्पष्ट दिसते. त्यांच्या पावलांच्या खुणाही त्या शिळेवर दिसतात. हा परिसर मोठा रम्य आहे. पादुका, मंदिर, आजूबाजूची वनश्री हे सर्व मन प्रसन्न करणारे, त्याचप्रमाणे अंतर्मुख करणारे आहे. कुरवपूर हे स्थान कित्येक वर्षे अज्ञातच होते; पण श्रीगुरूंच्या शोधात आलेल्या श्री वासुदेवानंदसरस्वती टेंबेस्वामीमहाराज यांनी या स्थानाचा शोध लावला. कुरवपूर हे आंध्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवरील रायचूर जिल्ह्यातील एक खेडे आहे. चारी बाजूंनी कृष्णामाईच्या प्रवाहांनी वेढलेले हे बेट आहे. पावसाळ्यात कृष्णामाईच्या पुरामुळे आणि उन्हाळयात न सोसणा-या कडक उन्हामुळे इथे जाणे त्रासदायक होते. डिसेंबर ते फेब्रुवारी हे तीनच महिने इथे प्रवासाला सुखकारक असतात.

‘आश्विन वद्य व्दादशी’ हा श्रीपाद श्रीवल्लभांचा तिरोहित होण्याचा म्हणजेच निजानंदगमनाचा दिवस. या दिवशी कुरवपूरला मोठा उत्सव असतो.

रायचूरपासून २९ कि. मीटरवरील ‘आतकूर’ या गावी जाऊन तेथून कुरवपूर बेटावर जाण्यासाठी थोडे चालत कृष्णेच्या काठावर जावे लागते. पलीकडे जाण्यासाठी आता नावेची सोय झाली आहे. कृष्णा नदी पार करण्याचा अनुभव प्रत्येक मोसमात वेगळा असतो.

नदीच्या पात्रात सभोवार अजस्त्र शिळा आहेत. एकामागून एक असे चार प्रवाह ओलांडून आपण पैलतीरी जातो. समोर थेट कुरवपूर गावच्या बुरूजानजीकच्या वेशीवरून पायवाटेने पश्चिमेस डाव्या हाताने आत शेतीच्या बांधावरून थेट श्रीपाद श्रीवल्लभांच्या मंदिरात पूर्व दरवाजाजवळ आपण पोहोचतो. हे बेट साधारण तीन मैल लांब, तीन फर्लांग रूंद असे असून कूर्माकार आहे. बेटावर पुढील स्थळे पाहण्यासारखी आहेत.

Author – Unknown source